सांगली प्रतिनिधी । महाराष्ट्र ही संतांची व थोर महापुरुषांची भूमी असून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचे जवळचे संबध आहेत.गेल्या महिन्यांपूर्वी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जत तालुक्याला पाणी देण्याबाबत एक तास चर्चा झाली. त्यानुसार महाराष्ट्रातील सीमाभागाला पाणी देण्याची कर्नाटक राज्याची तयारी आहे. यासाठी तुबची-बबलेश्र्वर योजनेतून किंवा कोट्टलगीजवळ आलेले पाणी बोर नदीत सोडून जतच्या पूर्व भागाला दिल्याने, एक लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याची ग्वाही कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुराप्पा यांनी दिली. मुख्यमंत्री जत तालुक्यातील संख येथे आयोजित महायुतीचे उमेदवार आमदार विलासराव जगताप यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, विजापूरचे आमदार विजयगौडा पाटील, उपस्थित होते.
यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा म्हणाले की ,पाण्यासाठी कोणावरही अन्याय होऊ नये तसेच शेतीच्या उत्पन्न वाढीसाठी पाणी सर्वाना मिळावे अशी भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची असून यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा होईलच. मात्र या विधानसभेला मतदान करताना कोणत्याही प्रकारचा जातीभेद मनात आणू नये, त्याचा विकासाला व पक्षाला फटका बसतो. यासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करा.विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बहुधा ही माझी पहिलीच जाहीर सभा असून तुमचा निश्र्चय पक्का झाल्याचा विश्र्वास मला असून तो विश्र्वास सार्थ ठरवत महायुतीचे उमेदवार विलासराव जगताप यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन शेवटी मुख्यमंत्री बी.एस.येडीयुराप्पा यांनी केले.