कांदा निर्यातबंदी करून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांशी बेईमानी केली- बच्चू कडू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती । केंद्रातील मोदी सरकारने काही महिन्यांपूर्वी उठवलेली कांद्यावरील निर्यातबंदी आता पुन्हा तडकाफडकी लागू केली आहे. त्यामुळे लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याची आर्थिक झळ बसणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी नाशिकच्या सभेत म्हणायचे मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत बेईमानी करणार नाही. मग ही बेईमानी नाही तर काय आहे, असा सवाल बच्चू कडू यांनी मोदींना विचारला.

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. कांद्याच्या निर्यातबंदीचे काही कारण नव्हते. कांदा हा जीवनावश्यक वस्तूंमधून काढला होता. कांदा नाही खाल्ला तर कुणी मरत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करायला पाहिजे होता. मात्र, मोदी सरकारने पुन्हा शेतकऱ्याच्या छातीवर तलवार चालवून त्याला रक्तबंबाळ केल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले.

यावर्षी ऐन उन्हाळ्यात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांनी आपला कांदा कवडीमोल भावात विकला होता. आता कांद्याचे दर वाढत असतानाच केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. तसेच कांदा प्रश्नावर दिल्लीत जाऊन छुप्या पध्दतीने आंदोलन करणार असल्याचा इशाराही राज्यमंत्री बच्चू यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.