जळगाव । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजप शिवसेनाला या मुद्दयावर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात भाजपा विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत असतांना त्याच्यावर अविश्वास दाखवत सीबीआय चौकशी करण्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला आहे. भाजपाचे नेते गोपिनाथ मुंडे यांचा अचानक मृत्यू झाला तेव्हा भाजपाला त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी असे का वाटले नाही, अशी विचारणा गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, राष्ट्रपतीसारख्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीचा कार्यक्रम माध्यमांवर गरजेपुरता दाखवला जातो. परंतु, सुशांतसिंग राजपूत आणि कंगना यांच्या बाबतीत आता माध्यमे मिनिट टू मिनिट कार्यक्रम दाखवत आहेत. हे अयोग्य आहे. सुशांतने काय देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे का? तो दारू, सिगारेट घेणारा होता. त्याच्या बाबतीत साऱ्या गोष्टी उलगडल्या आहेत. असे असताना टीव्हीवर मात्र, चीनची बातमी दिसत नाही असं पाटील यांनी म्हटलं.
एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत असताना त्याची कधी सीआयडी चौकशीची मागणी भाजपने केली नाही. 52 टक्के रोजगार देणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कधी सीआयडी चौकशी होत नाही. एवढेच काय तर गोपीनाथ मुंडेंसारख्या बड्या नेत्याच्या मृत्यूची सीआयडी चौकशी भाजपला का करावीशी वाटली नाही? बिहारमध्ये राजपूत समाजाची मते हवी असल्यानेच भाजपकडून असे राजकारण सुरू आहे. यांच्या टाळूवरचे लोणी खाऊन भाजपला सत्ता मिळवायची आहे. म्हणूनच भाजपचे हे थोतांड सुरू असल्याचा घणाघात देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.