सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांचे जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केले आहे. मागील आठवड्यात त्यावर अंतिम सुनावणी झाली होती. समितीच्या सदस्यांनी कायद्याचा अभ्यास करुन दक्षता पथकाच्या अहवालाचा आधार घेतला. त्यानुसार डॉ. महास्वामी यांनी दिलेले पुरावे बनावट असल्याचे सिध्द झाल्याने हा निर्णय घेतल्याचे समितीच्यावतीने सांगण्यात आले. सोलापुरातील जात पडताळणी समितीने घेतलेल्या निर्णयाविरुध्द खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, वंचित बहूजन आघाडीचे डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांना पराभूत करुन भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी विजयी झाले. मोठ्या फरकाने त्यांनी विजय मिळविला, परंतु त्यांनी जोडलेले बेडा जंगमचे जात वैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप प्रमोद गायकवाड यांनी केला. त्यानुसार त्यांनी जात वैधता पडताळणी समितीकडे अपिल केले. जात पडताळणी समितीने डॉ. महास्वामी यांनी जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी दक्षता पथक नियुक्त केले. त्यांनी सर्व ठिकाणचे कागदपत्रे पडताळली, मात्र ते बनावट असल्याचे लक्षात आले. त्यानुसार जात पडताळणी समितीने त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
जोडलेली कागदपत्रे व जात वैधता प्रमाणपत्र बनावट नसल्याबाबत ते याचिका दाखल करणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. दरम्यान, कायद्याचा आधार घेवून निकाल दिला आहे, परंतु ज्यांना निकाल मान्य नसेल ते न्यायालयातून दाद मागू शकतात, असे जात पडताळणी समितीने स्पष्ट केले आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.