सातारा प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
साताऱ्याचे खा.उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेशाबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी यावेळी बोलताना ते म्हणाले,” विकास कामानिमित्त मुख्यमंत्र्यांची गाठ घेतली होती. भाजप प्रवेशाबाबत भाजपचे अनेक नेते संपर्कात आहेत का? असा प्रश्न उपस्थित पत्रकारांनी विचारल्यावर उदयनराजे पुढे म्हणाले, “प्रत्येक पक्षातील नेते माझे मित्र असुन माझे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत म्हणून पक्ष बदल वगैरे असा त्याचा अर्थ होत नाही. जेव्हा वेळ येईल त्यावेळेस लोकांच्या हिताचा निर्णय मला घ्यावाच लागेल.” दरम्यान विकास कामांच्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कौतुक करून आज पर्यंत सातारच्या विकासाची कामे त्यांनीच केल्याचे सांगून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळात नुसती अडवा-आडवीचीच कामे झाली अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
रामराजे आणि तुम्ही एकत्र प्रवेश करणार आहात का ? या प्रश्नावर बोलताना त्यांनी ते राजे आहेत माझी आणि त्यांची बरोबरी होऊच शकत नाही ते मानाने सुद्धा मोठे आहेत त्यामुळे कृपया मला त्यांच्या बरोबर जोडू नका अशी बोचरी टीका त्यांनी केली.