बुलढाणा प्रतिनिधी | मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील प्रवीण नारायण सराफ यांच्या घरी स्वयंपाक करताना अचानक गॅस रेग्युलेटर फुटल्याने गॅसचा भडका होऊन घरातील 75 हजार रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली.
जानेफळ येथील प्रवीण सराफ यांच्या पत्नीला ‘उज्वला योजना’ अंतर्गत ‘एच पी गॅस’ मिळाला होता.आज सकाळी त्या स्वयंपाक करत असताना अचानक गॅसचे रेग्युलेटर फुटले व गॅसने पेट घेतला. प्रवीण यांनी तत्काळ समयसूचकता दाखवून पत्नीला व पाच वर्षाच्या मुलीला घराच्या बाहेर काढले. त्यांच्या या समयसूचकतेमुळे दोघींचेही प्राण वाचले. त्याच दरम्यान सदर गॅसने पेट घेत जोराचा भडका उडाला.
लागलेल्या आगीमुळे खोलीमधील बरेच साहित्य जळाले. खोलीतील कूलर, फॅन , दिवान , कपाट, स्लाइडिंग खिडकी, मोबाईल व स्वयंपाक साहित्य असे मिळून ७५,००० रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली.
बऱ्याच वेळेनंतर अग्निशामक दलाला आग विझविण्यात यश मिळाले. मात्र परिसरामध्ये पेटता सिलिंडर दिसल्याने एकच खळबळ माजली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र प्रवीण यांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला.