जालना । सतिश शिंदे
जिल्ह्यातील प्रत्येक गाव पक्क्या व मजबुत डांबरी रस्त्याने जोडणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. परतूर तालुक्यातील वलखेड येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामांचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते झाला.
पालकमंत्री श्री.लोणीकर म्हणाले की, आपल्या कार्यकाळात जिल्ह्यातील रस्त्यांचे आराखडे तयार करण्याचे निर्देश यापुर्वीच दिले होते. गेल्या तीन वर्षात 200 गावांमध्ये पक्के व डांबरी रस्ते तयार करण्यात आले आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांना त्यांचा माल बाजारपेठेत नेण्यासाठी होत आहे. तयार झालेल्या रस्त्यांची जबाबदारी कंत्राटदारांची असून ५ वर्षात रस्ते खराब झाल्यास त्यांनाच ते दुरूस्त करुन देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी केंद्र शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून शहरांसह ग्रामीण भागात दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गांतर्गत दिंडी मार्ग म्हणून खामगाव-लोणार-मंठा-परतूर-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या ४३० किलोमीटरच्या रस्त्याचे काम वेगाने करण्यात येत आहे. यावलपिंप्री तांडा येथे ३ कोटी ५१ लक्ष रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
पालकमंत्री श्री.लोणीकर यांच्या हस्ते घनसावंगी तालुक्यातील यावल पिंप्री तांडा – १ येथे राजेगाव-गडमंदिर-यावलपिंप्री तांडा ते रामा या ३ कोटी ५१ लक्ष रुपये किंमतीच्या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावल पिंप्री तांडा येथे झालेल्या कार्यक्रमास माजी आमदार विलास खरात, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, सरपंच छबुराव राठोड यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.