वृत्तसंस्था | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचे पंतप्रधान मोहम्मद महातीर यांच्याशी चर्चा केली आणि वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईक याला भारताच्या ताब्यात देण्याचा मुद्दा उपस्थित केला. इस्लामचा प्रचार करण्याचा दावा करणाऱ्या झाकीर नाईकवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे आणि पैशांची अफरातफर केल्याचे अनेक आरोप असून, तो भारताला अनेक खटल्यांमध्ये ‘वाँटेड’ आहे.
‘इस्टर्न इकॉनॉमिक फोरम’ने (इइएफ) आयोजित केलेल्या पाचव्या परिषदेमध्ये मोदी आणि महातीर यांची भेट झाली. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी झाकीरचा मुद्दा उपस्थित केला आणि त्याला भारताच्या स्वाधीन करण्याची जोरदार मागणी केली. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० भारताने का हटविले आणि जम्मू-काश्मीर तसेच लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा का दिला, या संदर्भातही पंतप्रधान मोदी यांनी महातीर यांना माहिती दिली, अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकारांना दिली.
दोन्ही देशांचे सचिव स्तरावरील अधिकारी तसेच परराष्ट्र खात्यातील इतर वरिष्ठ अधिकारी झाकीर नाईकच्या हस्तांतराच्या मुद्द्यावर परस्परांच्या संपर्कात राहतील आणि हा विषय पुढे नेण्यासाठी चर्चा करीत राहतील. हा विषय दोन्ही देशांच्या संदर्भाने महत्त्वाचा आहे, असे गोखले यांनी पत्रकारांशी संवाद सांगताना सांगितले.