रत्नागिरी प्रतिनिधी | दापोली तालुक्यातील टेटवली येथील पंकज कदम या युवकाचा सर्पदंश झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातिल डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत डॉक्टरांवर व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी संतप्त जमावाने यावेळी घोषणाबाजीही केली आहे. पंकज कदम या 15 वर्षीय मुलाचा मृत्यू दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांमुळे झाला आहे, त्यामुळे डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा अन्यथा प्रेत उचलणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
पोलिसांनी मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला नाही त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी काही काळ प्रेत उपजिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावर ठेवून ठाण मांडल्याने गोंधळ उडाला होता. प्रेत रुग्णालयात घेतल्यानंतर संतप्त जमाव पुन्हा पोलीस स्टेशनसमोर ठाण मांडून बसला. यावेळी वातावरण चांगलच तापलेलं असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.