तांबवेत एक वर्षाच्या चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील तांबवे गावात एक वर्षाच्या चिमुकलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरामुळे तालुक्यात डेंग्यूची साथ चांगलीच पसरली असून तांबवे गावातील एक वर्षाची चिमुकली आन्वी महेश पवार-पाटील हीचा बुधवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

तांबवे गावात मागील काही दिवसांपासून डेंग्यू सदृश लागण सुरू झाली आहे. त्यातच येथील महेश संजय पवार यांची एक वर्षाची कन्या अन्वी ही गेली दोन दिवस ताप व सर्दीमुळे आजारी होती. तिच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. सुरुवातीला व्हायरल इन्फेक्शन म्हणून औषधोपचार सुरू होते. काल रात्री अचानक त्रास सुरू झाले नंतर कराडला खाजगी दवाखान्यात तिला दाखल केले. तिथे रक्त तपासणी केल्यानंतर तिला डेंग्यू असल्याचे सांगण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु असतानाच मृत्यु झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या महिन्यातच अन्वीचे वडील महेश पवार व आई निलम पवार यांना डेंग्यू झाला होता. त्या आजारातून आई वडील बाहेर पडले आणि या लहान बालिकेचा डेंग्यूने जीव घेतला. तांबवे गावातील या वर्षीचा डेंग्यूचा पहिला बळी गेला. गावात कोयना नदीला आलेल्या महापुराने पाणी घुसले आणि एक महीन्यातच डेंग्यू ची लागण सुरु झाली. आतापर्यंत सुमारे ४० ते ५० जणांना डेंग्यूची लागण झाली होती. सद्या सर्वत्रच डेंग्यूची लागण सुरू आहे.

कुमारी अन्वी महेश पवार हिचा नुकताच १७ नोव्हेंबरला पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला होता. घरात अन्वीच्या काकांच्या लग्नाची घाई सुरू आहे. त्यातच या बालिकेचा डेंग्यूने जीव गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.