कोल्हापूर प्रतिनिधी । साखर आयुक्तांच्या तीन टप्प्यातील एफ आर पी च्या वक्तव्याचा जाब शेतकरी संघटनांकडून साखर आयुक्तांना आज विचारण्यात आला. तसेच थकीत एफ आर पी आणि 15% व्याज दिल्याशिवाय या हंगामात कोणत्याही कारखान्यास गाळप परवाने देऊ नयेत अशी विनंती आज जय शिवराय किसान मोर्चा आणि बळीराजा शेतकरी संघटना यांच्या प्रमुखांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना भेटून केली.
या वेळी मा.साखर आयुक्तांनी 15% व्याजाबाबत कारखान्यावर स्वतंत्र आर आर सी कारवाई या महिना अखेर पर्यंत करण्याचे आणि मागील हंगामाचा अंतिम दर हा हंगाम सुरू होण्यापूर्वी जाहीर करण्यात येईल असे सांगितले. सर्वात महत्वाचे म्हणजे या वर्षीचा गाळप हंगाम 1 डिसेंबरला सुरू करण्याची मागणी साखर संघाने केली असली तरी हंगाम 10 नोव्हेंबर पूर्वी सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तोडणी वाहतूक शासन निर्णय , पंधरवडा एफ आर पी रिपोर्ट मध्ये व्याजाची रक्कम देणे बंधनकारक करणे आणि कॉस्ट ऑडिट ही दरवर्षी करून देण्याचे बंधन घालण्याबाबत देखील सकारात्मक प्रतिसाद माननीय साखर आयुक्त यांनी दिला. या वेळी धनाजी चुडमुंगे , शिवाजीराव माने , बी जी पाटील, मनोज राजागिरे, इ. प्रमुख उपस्थित होते. दरम्यान या भेटीमुळे आणि माननीय साखर आयुक्तांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे यंदाच्या हंगामामध्ये सर्व प्रश्न सुटतील अशी आशा आहे.