दसरा विशेष | विजयादशमी म्हटलं की आपल्याला राजे-रजवाडे आठवतात. कारण त्यांचा दसरा आपण सिनेमांमध्ये पाहिला आहे, गोष्टीरूपांमध्ये ऐकला आहे आणि अनेक ऐतिहासिक पुस्तकांमधून वाचला आहे. सीमोल्लंघनाचा या दिवशी सीमा कुठे उल्लंघन करायची, ती दिशाही ठरलेली असायची आणि काळही. त्यांचा तो विजयाचा सहजसुंदर असा सोहळा आजही आपल्याला पाहायला, वाचायला आवडतो.
दसऱ्याच्या दिवशी सकाळी हत्ती, घोडे यांना स्नान घातले जायचे. त्यांच्यावर भरजरी वस्त्रे आणि अलंकारही चढवले जायचे. अशा रितीने सजवून त्यांना भव्य अशा राजवाड्यासमोर आणून उभे केले जायचे. मग सिंहासनाची पूजा व्हायची. नंतर राजे आपल्या लव्याजम्यासह सीमोल्लंघनाला निघायचे. त्यावेळी आधी स्वस्तीवाचन व्हायचे, मिरवणुकीबरोबर रणवाद्ये असायची. राजा पूर्णपणे शस्त्रसज्ज होऊन हत्तीवर अंबारीत वा घोड्यावर बसून मिरवणुकीने निघायचा. जाताना मार्गावरील देवदेवतांची पूजा व्हायची. शमीवृक्षाजवळ पोहोचल्यावर शमी वृक्षाची, अपराजितेची पूजा व्हायची. ‘अपराजिता’ देवी मला विजय देवो, तसेच शमीची प्रार्थना करून राजा हातात खड्ग घेऊन पूर्वेकडून सुरुवात करून अष्टदिशांना काही पावले चालायचा. नंतर इंद्रादी देवांना नमस्कार करून चतुरंग सेनेचे संचलन व्हायचे. जयघोषात मिरवणूक राजवाड्याच्या महाद्वारात आल्या सुवासिनी शास्त्रोक्त पद्धतीने ओवाळायच्या. नंतरच राजा राजवाड्यात प्रवेश करायचा. त्या वेळी मंत्रोच्चार, आशीर्वचने व्हायची.
अशाप्रकारे राजे प्रतिवर्षी सीमोल्लंघनाचा शास्त्रोक्त विधी करत. असे केल्याने विजय आणि ऐश्वर्य प्राप्त होते, अशी या विधीची फलश्रुती सांगितली जाई. असा विजय, ऐश्वर्य प्राप्त करून देणारा हा दसऱ्याचा दिवस. सर्व शुभकार्यांना उचित मानला जातो.
दसरा हा भारतातील एक सार्वत्रिक सण आहे. सर्व लोक हा सण पाळतात. हा विजयाचा, पराक्रमाचा सण आहे. अर्जुनाने अज्ञातवासात असताना शमीच्या झाडाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रे काढून घेऊन विराटाच्या गाई पळवणाऱ्या कौरवांच्या सैन्यावर स्वारी केली आणि विजय मिळवला तो याच दिवशी. रामचंद्राने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला तो याच दिवशी. या घटनांच्या संकेतामुळेच या दिवसाला ‘विजयादशमी’ हे नाव मिळाले आहे.