टीम, HELLO महाराष्ट्र | पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर यंदाही तब्बल 25 हजार महिलांनी ‘ओम् नमस्ते गणपतये ओम गं गणपतये नम: , मोरया-मोरया’ च्या जयघोषाने अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीने गणेश भक्तीचा जागर केला.
सर्व महिला पहाटे 5 वाजल्यापासून पारंपरिक वेशात या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. तसच गणरायाच्या नामाचा जयघोष करत ॠषीपंचमी निमित्त आयोजित सोहळ्यात या महिलांनी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये अथर्वशीर्ष पठण केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्यास विधान परिषदेच्या उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे, परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, शुभांगी भालेराव आदींसह महिला कार्यकर्त्या आणि परदेशी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता मोठी गर्दी केली होती.
तब्बल ३३ वर्षांपूर्वी महिलांचा सहभाग या गणेशोत्सवात असावा याकरीता ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांनी या उपक्रमाला सुरुवात केली होती. आज त्याचाच भाग म्हणून 25 हजारांहून अधिक महिलांनी हे अथर्वशीर्ष पठण केले.