दगडूशेठ ट्रस्ट आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेच्या पुणे विभागाचा निकाल जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागात नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, सिटी पोस्ट चौकातील महाराष्ट्र तरुण मंडळाने द्वितीय, कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने तृतीय, गुरुवार पेठेतील वीर शिवराय मित्र मंडळाने चौथे तर नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या १५६ मंडळांपैकी ९८ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून ट्रस्टच्या वतीने एकूण १२ लाख ६ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेला सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, नगरसेवक हेमंत रासने, राजाभाऊ सूर्यवंशी, कुमार वांबुरे, दत्तोपंत केदारी, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार, दिनांक २० आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे होणार आहे. कार्यक्रमाला पुणे जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मुक्ता टिळक, माजी आमदार उल्हास पवार, अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत काळभैरवनाथ तरुण मंडळाच्या प्लॅस्टिक प्रदूषणाचा धोका, अणू युद्धापेक्षा मोठा या देखाव्याला ५१ हजार रुपयांचे, महाराष्ट्र तरुण मंडळाच्या शिवबांच्या अदालतीतील दूध भेसळखोर या देखाव्यास ४५ हजारांचे, श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या १९७१ ची युद्धभूमी या देखाव्याला ४० हजारांचे, वीर शिवराय मित्र मंडळाच्या वाहतूक समस्या पुण्याची व जगाची या देखाव्याला ३५ हजारांचे आणि संयुक्त प्रसाद मित्र मंडळाच्या टाकाऊ संगणकीय कच-यापासून श्री मूर्ती या देखाव्याला ३० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले.

Leave a Comment