सोलापूर प्रतिनिधी | आर्थिक मंदीमुळे देशातील मोठे मोठे उद्योग व्यवसाय अडचणीत असतानाच दुसरीकडे राज्यात सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन करणारा अशी ओळख असलेला सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग यंदाच्या दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नसल्याने हजारो एकर क्षेत्रावरील ऊस पीक पाण्याअभावी जळून गेले आहे. तर उर्वरित ऊस चाऱ्यासाठी वापरला जातो आहे. पाणी टंचाईमुळे यंदा जिल्ह्यात केवळ ८ ते १० साखर कारखाने सुरु होतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साखर उद्योगाला जवळपास ९०० ते १ हजार कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता साखर कारखानदारांमधून व्यक्त जातीये.
दुष्काळी जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख असली तरी उजनी आणि वीर धरणाच्या पाण्यामुळ जिल्ह्यात मोठया प्रमाणावर ऊसाच उत्पादन होत. वाढत्या ऊस उत्पादनामुळ सोलापूर जिल्ह्यात राज्यात सहकारी आणि खासगी मिळून सर्वाधिक 36 साखर कारखाने उभे राहिलेत. यापैकी ३४ साखर कारखाने दरवर्षी गाळप करत आहेत.
मागील तीन चार वर्षापासून सोलापूर जिल्ह्यातील पावसाच प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळ केवळ उजनी आणि वीर धरणातून मिळणाऱ्या पाण्यावर येथील शेतकरी ऊसाची शेती करतात. दरम्यान गेल्या वर्षीपासून जिल्ह्यातील साखर उद्योगाला दुष्काळाच ग्रहण लागले आहे.
गेल्यावर्षी जिल्ह्यातील ३२ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. या सर्व साखर कारखान्यांनी मिळून १ कोटी ६१ लाख २८ हजार ५२४ मे.टन ऊसाच गाळप करुन १ कोटी ३० लाख टन साखर उत्पादन केल होत. साखर उद्योगातून दरवर्षी सोलापूर जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. गतवर्षी आणि चालू वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने साखर उद्योगाला घर घर लागली आहे.
यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात फक्त ९७ हजार ८६ हेक्टर क्षेत्रावर ऊसाच पीक आहे. यातून केवळ ६६ लाख १ हजार ८८४ मे.टन उसाच उत्पादन मिळणार आहे. गतवर्षी झालेल्या हंगामाच्या तुलनेत तब्बल ९५ लाख टनांनी ऊसाच गाळप कमी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही मोजकेच साखर कारखाने सुरु होतील असा अंदाज आहे.
\