नाशिक | सतिश शिंदे
इगतपुरी तालुक्यात ५० वर्षानंतर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असून यावर मात करण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले.
पंचायत समिती नाशिक येथे दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., उपविभागीय अधिकारी कुमार आशिर्वाद, राहुल पाटिल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, तहसिलदार शरद आवळकंठे, वंदना खरमाळे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, भरत वेंदे, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अपर्णा खोसकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.शिंदे म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या माध्यमातून रोजगाराची तरतूद करण्यात यावी. जनतेला गरजेनुसार पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी टंचाईग्रस्त गावात टँकरचे योग्य नियेाजन करावे. राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी म्हणाले, नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी ब्रिटीशकलीन बंधारे आहेत. सीएसआर अंतर्गत त्यांना पुनर्जिवित करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कृषी , लघुपाटबंधारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पंचायत समिती, तहसील कार्यालय, वन विभाग, पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस विविध विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
तत्पूर्वी प्रा.शिंदे यांनी इगतपुरी तालुक्यातील वासाळी गाव व नाशिक येथील तिरडशेत गावातील शिवारातील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी या भागात पीकांचे कशाप्रकारे नुकसान झाले आहे याची पाहणी केली. संकटाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.