दुष्काळ निवारण करण्यासाठी शासन आवश्यक त्या उपाय योजना करणार – पालकमंत्री डॉ. दीपक सावंत

Chandrakant Khaire
Chandrakant Khaire
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । सतिश शिंदे

जिल्ह्यात सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. परंतु या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि काटेकोर वापर करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा-पाणी देण्यास शासनाचा अग्रक्रम असून दुष्काळ निवारणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणार असल्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारणासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. यावेळी खा. चंद्रकांत खैरे, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयाणी डोणगावकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार तसेच सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी संपूर्ण जिल्ह्याची दुष्काळ निवारण उपाययोजनांबाबत सादरीकरणाद्वारे पालकमंत्र्यांना माहिती दिली.

पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील टंचाई निवारणाबाबतचा जून २०१९ पर्यंतचा आराखडा तयार आहे. हा आराखडा बनवताना शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी तसेच पशुधनालाही पाणी मिळेल याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी पिण्यासाठी प्राधान्याने वापरण्यात येईल. त्यामुळे सर्वांनी पाण्याची बचत करणे गरजेचे आहे. शासन शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशिल असून दुष्काळी परिस्थितीत जास्तीत-जास्त गावातील शेतकऱ्यांच्या हाताला कामे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचेही डॉ.सावंत यांनी यावेळी सांगितले.

टंचाई निवारणाबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, पाणी उपलब्धतेसाठी विहीर खोलीकरण तसेच स्त्रोत बळकटीकरण करताना शेतकऱ्यांना कामे देण्यात यावीत जेनेकरून त्यांना रोजगार उपलब्ध होईल. या परिस्थितीत अधिकाऱ्यांनीही संवेदनशिलपणे काम करून आपली जबाबदारी पार पाडावी असेही डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.