कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने शेती करण्यासाठी दिलेल्या जमिनीवर विनापरवाना इमारत बांधल्याप्रकरणी मोरेवाडी येथील आर. एल. तावडे फाउंडेशनकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने गुरुवारी जागा ताब्यात घेतली. एकूण तीन एकर जागेपैकी सात हजार चौरसफूट जागेत इमारत बांधून खंडकरी जमिनीच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेल्याचे देवस्थान समितीला आढळून आले. मंडल अधिकारी स्वरूप पाटील यांच्यामार्फत जमिनीची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत.
करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थानच्या अखत्यारीतील तीन एकर जागा तावडे फाउंडेशनला शेती करण्यासाठी २००६ साली देण्यात आली. गट क्रमांक ५३, ५५, ५६ व ५७ या जमिनीवर शेती करण्याची परवानगी होती. मात्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या तावडे फाउंडेशनने गट क्रमांक ५७च्या अंतर्गत ७ हजार चौरसफूट जमिनीवर बेसमेंट व पहिला मजला अशी इमारत बांधली. शाळेसाठी इमारत बांधल्याने आमचा उद्देश समाजाभिमुख असल्याचे स्पष्टीकरण तावडे फाउंडेशनने दिले.
मात्र, देवस्थान समितीने दिलेल्या जमिनीवर शेतीच केली पाहिजे असा नियम आहे. गेल्या १४ वर्षांपासून या जमिनीवर शेती केली जात नव्हती. ही बाब २०१२ मध्ये देवस्थान समितीच्या निदर्शनास आली. तेव्हापासून समितीच्यावतीने जागा ताब्यात घेण्यासाठी नोटीस पाठवणे, कागदपत्रांची मागणी करणे ही प्रक्रिया सुरू केली. मात्र या प्रक्रियेला तावडे फाउंडेशनने प्रतिसाद दिला नाही. एका नोटिशीला फाउंडेशनकडून दिलेले उत्तरही योग्य नव्हते. त्यामुळे जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया गुरूवारी पूर्ण करण्यात आली असे देवस्थान समितीच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पोवार, सहसचिव एस. एस. साळवी, अभियंता सुजय देशपांडे, मंडल अधिकारी स्वरूप पाटील आदी उपस्थित होते.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.