सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
किरकोळ वाद किती टोकाला जाऊ शकतो याचा प्रत्यय आज सांगली करांना आला. दोन गटात झालेल्या भांडनातुन एक गट आक्रमक झाला आणि त्यातील एकाने तलावर बाहेर काढून नागरिकांत व समोर असलेल्या गटास दहशत माजवन्याचा प्रयत्न केला. सांगली शहरातील स्फूर्ती चौकामध्ये किरकोळ कारणावरून काल सायंकाळी वाद झाला होता. या वादातूनच दोन गटामध्ये संघर्षाची ठिणगी पडली.
दुसऱ्या गटातील युवकांवर हल्ला करून परिसरामध्ये दहशत माजवण्यासाठी पोत्यामध्ये तालवारीसह धारदार शस्त्रे घेऊन तिघे काल सायंकाळी स्फूर्ती चौकामध्ये थांबले होते. खास बातमीदारांमार्फत याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक बिरोबा नरळे यांना मिळाली. त्यांनी तातडीने त्यांच्या पथकातील अन्य साथीदारांसह स्फूर्ती चौकाकडे धाव घेतली. या चौकामध्ये प्रेमराज भोसले, अभिजित पाटील यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा संशयित रित्या थांबलेले दिसले. त्यांच्याकडे जाऊन का थांबला आहेत असे विचारले असता ते उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांच्याकडे असलेल्या पोत्याबाबत विचारले असता त्यांना काहीच सांगता येईना.
दरम्यान पोलिसांनी त्यांच्यासह पोत्याची झडती घेतली असता पोत्यामध्ये त्यांना दोन धारदार तलवारी आढळून आल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्यांना तातडीने ताब्यामध्ये घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी दोन गटात झालेल्या भांडणातून एकाला मारून परिसरामध्ये दहशत माजवण्यासाठीच या तलवारी आणल्या असल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्यावर कारवाई करत आर्म ऍक्ट नुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आता विश्रामबाग पोलीस करत आहेत.