गडचिरोली प्रतिनिधी | गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या पोलिसांवर भुसूरूंग स्फोटाद्वारे हल्ला करण्याचा नक्षलवाद्यांचा कट उधळून लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. केंद्रीय राखीव पोलिस दल आणि महाराष्ट्र पोलिस जवानांना लक्ष करून नक्षलवाद्यांनी हा मोठा कट रचला होता. हा कट उधळून लावल्यामुळे नक्षली मनसुबे यशस्वी होऊ शकले नाहीत.यामुळे कित्येक पोलिस जवानांवर आलेले संकट परतवून लावण्यात पुन्हा एकदा पोलिस यशस्वी झाले आहेत.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. पोलिस जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले आहे.
भामरागड तालुक्यातील हेडरी पोलिस मदत केंद्र हद्दीतील बोडमेटा जंगल परिसरात पोलिस आणि सीआरपीएफ बटालियन १९१ कंपनीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते. दरम्यान, रविवारी सायंकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. तेव्हा नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. मात्र, जवानांनी सुध्दा नक्षलवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देऊन नक्षलवाद्यांचा घातपाताचा हा कट उधळवून लावला.