दिल्ली : ‘तुम्ही ताजमहालाकडे लक्ष दिलेलं नाही. ताजमहालचं संवर्धन करण्याची तुमची इच्छाशक्तीच दिसत नाही. तुम्हाला ताजमहालाचा संभाळ करता येत नसेल तर तसं सांगा, ‘आम्ही त्याला टाळं ठोकू किंवा तुम्ही तो उद्ध्वस्त करा’ अशा कडक शब्दात आज सर्वोच्च न्यायालयाने केन्द्र सरकार व भारतीय पुरातत्व विभागाला सुनावलं आहे. ताजमहालाच्या संवर्धनाच्या संदर्भातील एका खटल्यावर सुनावणी देताना न्यायालयाने ही टीपणी केली आहे.
‘तुम्ही ताजमहालाकडे नीट लक्ष दिलं असतं तर तुमची परकीय गंगाजळीची समस्या सुटली असती. तुमच्या हेळसांडीमुळे देशाचं किती नुकसान झालंय तुम्हाला माहित आहे का?’ असा सवालही न्यायालयानं यावेळी उपस्थित केला आहे. न्या. दीपक आणि न्या. मदन लोकुर यांच्या खंडपीठानं ही सुनावणी दिली आहे. ताजमहालाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी केंन्द्र सरकारने कोणती पावले उचलली आहेत त्याबद्दलची माहीती केंन्द्र सरकारने देण्याचे निर्देश यावेळी न्यायालयाने दिले आहेत.