परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
उच्च न्यायालयाने काल महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी अजित पवारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. परभणी जिल्ह्यात शिवस्वराज्य यात्रेनिमित्य जनतेशी संवाद साधण्यासाठी आले असता त्यांनी न्यायालयाच्या आदेशाबाबत आपली प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले,” मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो पण मी माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कोणत्याही कमिटीच्या मिटिंगला उपस्थित नव्हतो, मी माझं म्हणणं वकिलांमार्फत मांडणार आहे.पण नेमक्या निवडणुका आल्या की नोटीस, आदेश कसं काय निघतात?” असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीत प्रचार केल्यानंतर राज ठाकरे यांच्यावरती नऊ तास इडी ची चौकशी लावल्याचा दाखला ही त्यांनी दिला .
पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले कि, “जम्मू आणि काश्मीर मधून 370कलम हटवलं याच आम्ही स्वागत करतो. तुम्ही आता पाकिस्तान व चीन ने बळकावलेला काश्मीरचा भूभाग परत आणा. ऑक्टोबर मध्ये होणार्या निवडणुका या महाराष्ट्राच्या असून यामध्ये महाराष्ट्रातील वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न हे अत्यंत गंभीर असून सरकारमधील मंत्र्यांना या प्रश्नांची जाण नाही. त्यामुळे आगामी काळात आघाडी सरकारला पुन्हा सत्तेत आणल्यावर आम्ही रोजगार निर्मिती करून स्थानिकांना 75% नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवू .सर्व विभागातील नोकरभरती ही सत्तेत येताच सहा महिन्यात करू. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे काम पहिल्यांदा हाती घेऊ अन्यथा पवारांचे नाव लावणार नाही.” असा दावा त्यांनी यावेळी बोलताना त्यांनी केला आहे .