पिंपरी चिंचवड प्रतिनिधि | भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे रविवारी पुणे दौर्यावर होत्या. यावेळी पिंपरी चिंचवड येथील प्रचार सभेत गोंधळ झाला. पंकजा मुंडेंचे भाषण सुरु असताना नागरीकांमधून काही जणांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
पिंपरी चिंचवड परिसरात मराठवाड्यातून मोठा वर्ग आला अाहे. त्यांनी भाजपलाच मतं द्यावीत यासाठी जगताप यांनी मुंडे यांच्या सभेचे आयोजन केले होते. मात्र सभेत झालेल्या गोंधळामुळे ही सभा चर्चेत आली आहे. सभेतील गोंधळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घातला असल्याचा आरोप मुंडे यांनी भाषणावेळी केला.
मात्र आता गोंधळ घातलेल्यांमधे भाजप कनेक्शन असल्याचं समोर आलंय. भाजपचे स्वीकृत सदस्य संदीप गाडे यांची बहीण सुनीता फुले घोषणाबाजी करत होत्या. यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त केलं जातंय. वाकड पोलिसांनी 3 महिला आणि 3 पुरुष अशा सहा जणांना ताब्यात घेतल्यानंतर ही माहिती समोर आली. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिलाय. गाडे हे प्रभाग कार्यलयात स्वीकृत सदस्य आहेत.