दिल्ली : पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या सुरक्षेमधे वाढ करण्यात आली आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एस.पी.जी.) कडे पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. एस.पी.जी. च्या परवानगीशिवाय आता मत्र्यांनाही मोदींना भेटता येणार नसल्याचे बोलले जात आहे. २०१९ च्या निवडणुक प्रचारांत रोड शो एवजी जनसभा घेण्यावर भर देण्याचा सल्लाही एस.पी.जी. ने मोदींना दिला आहे. पंतप्रधान नरेंन्द्र मोदीं यांची हत्या करण्याचा सी.पी.आय.(माओवादी) संघटनेने कट रचला होता अशी चर्चा मधे रंगली होती. त्यातूनच पंतप्रधानांची सुरक्षा वाढवण्याचे पाऊल उचलले गेले असल्याचे समजत आहे.
पुणे पोलिसांनी कोरेगाव भिमा प्रकरणात पाच संशयित माओवाद्यांना अटक केल्यानंतर माओवाद्यांनी पंतप्रधानांच्या हत्येच्या कट रचल्याची माहीती समोर आली होती. त्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात तातडीची बैठक बोलावली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, केन्द्रीय गृह सचिव राजीव गौबा तसेच गुप्तहेर खात्याचे अधिकारी हे बैठकीस उपस्थित होते. नरेंन्द्र मोदी यांच्या सुरक्षेसंदर्भात बैठकीत चर्चा केल्यानंतर गृहमंत्री सिंह यांनी छत्तिसगड, झारखंड, प. बंगाल इत्यादी नक्षल प्रभावित राज्यांमधे हाय अलर्ट जारी केला होता. तसेच पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात आवश्यक पावले उचलण्याचे आदेशही संबंधित खात्यांना दिले होते. त्यातुनच पंतप्रधानांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचे समजत आहे.