चंद्रपूर प्रतिनिधी | प्रेमीयुगूल पळून जात असताना शेतात जंगली जनावरांचा शिरकाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या जिवंत तारेचा स्पर्श झाल्याने प्रेयसीचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रियकराने सकाळी वरोरा पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडीस आली.
भद्रावती तालुक्यातील एका गावातील रहिवाशी प्रियकर याचे वरोरा तालुक्यातील एका गावातील युवतीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र घरच्यांचा विरोध असल्याने दोघांनी पळून जायचे ठरवले व रात्री आठ वाजताच्या सुमारास ते तालुक्यातच एका नातेवाईकाच्या घराकडे जाण्यासाठी हे दोघेही निघाले होते. या प्रेमीयुगुलांना शोधण्यासाठी त्या मुलीच्या घरचे त्यांचा पाठलाग करत असल्याची माहिती प्रियकराने दिली त्या दरम्यान ते एका शेतात जंगली जनावर घुसू नये यासाठी विद्युत प्रवाह लावण्यात आला होता.
त्यामुळे त्या शेतातुन जात असताना या मुलीचा पाय ज्वलंत विद्युत तारेला लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रियकर याने दोन वेळा मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यालाही ही विजेचा स्पर्श झाल्याने तोही बाजूला झाला. हे ठिकाण वरोरा शहरापासून काही अंतरावरच असून मृतक मुलीच्या व त्या प्रियकराच्या नातेवाईकाच्या गावाच्या मधोमध आहे . प्रियकराने सकाळी वरोरा पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. मात्र पळून जायचा प्रेमीयुगुलांचा डाव नियतीने वाटेतच घाव घालून मोडून काढला. त्यामुळे अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी प्रेम कहाणी असेच म्हणावे लागेल या घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.