पालकमंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर तालुक्यातील पिकांची पाहणी

Vishnu Savara
Vishnu Savara
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर प्रतिनिधी | सतिश शिंदे

पालघर जिल्ह्यातील पिकांची बिकट स्थिती पाहता शासनाने तीन तालुक्यांमध्ये टंचाई सदृश स्थिती जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विष्णू सवरा यांनी पालघर तालुक्यातील चहाडे ग्रामपंचायत अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. या शेतांमधील भातपिकांचे दाणे आतून पोकळ असून त्याचा अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्ह्यातील पालघर, विक्रमगड आणि तलासरी तालुक्यात शासनाने प्राथमिकस्तरावर टंचाई परिस्थिती जाहीर केली आहे. अजूनही सर्वेक्षण सुरू असून लवकरच राज्यातील एकंदरीत स्थिती जाहीर केली जाणार असल्याने पालकमंत्री स्वतः जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी पालघर तालुक्यातील शेतांना भेट देऊन पाहणी केली.

या परिसरात अनियमित पाऊस, आवश्यकता असताना पाऊस न पडणे तसेच परतीचा पाऊस न पडणे या समस्यांमुळे या वर्षी खरिपांच्या पिकांची अवस्था बिकट आहे. याचा परिणाम म्हणून रबी हंगाम देखील संकटात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती स्थानिक शेतकरी तसेच ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांना दिली. त्यावेळी मी स्वतः अनेक शेतांना प्रत्यक्ष भेट दिली असल्याचे सांगून या परिस्थितीचा स्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना नियमानुसार शक्य ती सर्व मदत तातडीने मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. सवरा यांनी सांगितले.

संपूर्ण राज्यातली परिस्थिती पाहता शासनाने मदतीबाबतचा आराखडा तयार केला आहे. पालघर जिल्ह्यात स्थलांतराची समस्या आहे, ते रोखण्यासाठी नुकसान भरपाई तसेच पीक विमा आदींच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.

या दरम्यान पालकमंत्री श्री.सवरा यांनी पालघर तालुक्यातील ग्रामपंचायत चहाडे (सज्जन पाडा) येथे जिल्हा परिषद पालघर लघु पाटबंधारे विभागांतर्गत लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्याचे लोकार्पण केले. शेतीसोबतच जनावरांना पिण्यासाठी अशा बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.