कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
‘देशात धर्माच्या ध्रुवीकरणातून जातीय तेढ निर्माण करणारी शक्ती मोठ्या गतीने कार्यरत झाली आहे. त्यांना पुन्हा पेशवाईकडे देशाला न्यायचे आहे. जनतेने आपला विकास आणि जातीय सलोखा राखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तीबरोबर रहावे. पेशवाई आणू पाहणाऱया शक्तींना ओळखून त्यांचा हा कुटील डाव उधळून लावावा’ असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील ब्रम्हदासनगरमध्ये रस्ता काॅंक्रीटीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
आ. चव्हाण म्हणाले, सध्या राजकीय क्षेत्रात सर्वत्रच अनपेक्षीत घडामोडी होत आहेत. जी मंडळी सत्ताधाऱयांची अमिषे व दबावाला बळी पडत आहेत. त्यांनी जनतेचा विचार न करता वेगळी पाऊले टाकली आहेत. येत्या दोन महिन्यात तुम्हालाही अमिषे दाखवली जातील. पेशवाई आली त्यावेळी जातीय तेढ निर्माण करत गुलामगिरीसुध्दा भोगावी लागली. तशापध्दतीने पेशवाई आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. ते म्हणाले, काही नेत्यांना चौकशीची भीती दाखवली जात आहे. कर्नाटकमध्ये बहुमतातील सरकार भाजप सरकारने कुटील डाव टाकून पाडले. लोकशाहीला छेद देण्याची प्रक्रिया होताना दिसते. जयवंतराव जगताप म्हणाले, जी लोकं गेल्या पाच वर्षात सर्वसामान्यांच्या सुख व दुःखात सामील झाली नाहीत. ती मंडळी गावोगावी अमिषे दाखवत फिरत आहेत. त्यांना तुमचे येत्या दोन महिन्यात घेणेदेणे आहे. त्यानंतर ही मंडळी तुमच्याकडे फिरकणारसुध्दा नाहीत.
केवळ निवडणूकीपुरते भोसले कंपनीतील नेते राजकारण करतात. पृथ्वीराज चव्हाण हे निष्कलंक आहेत, त्यांच्या पाठिशी कराड दक्षिणेतील जनता ठाम आहे. शिवाजीराव मोहिते यांनी सांगितले की, पृथ्वीराजबाबांच्या फंडातून गावातील संपूर्ण अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण आणि काॅंक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. नुकताच बाबांनी गावासाठी सव्वाकोटी रुपयांचा भरीव निधी दिला आहे. त्यामध्ये शाळेच्या सहा खोल्या, बेघरवस्तीत काॅंक्रीटीकरण आणि गटारे, कालवडे रोड ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, बेलवडे ते कासेगाव रस्ता रुंदीकरण इतकी कामे मंजूर झाली असून, स्मशानभूमीसाठी 25 लाख आणि गावातील गटारे आणि साईडपट्ट्या काॅंक्रीटीकरण कामासाठी दहा लाख रुपये मंजूरीच्या प्रतीक्षेत आहेत. पंढरपूर येथील बेलवडे बुद्रुकच्या ग्रामस्थांच्या मठासाठी बाबांच्या प्रयत्नातून दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत. यावेळी बेघरवस्तीतील ग्रामस्थांनी आ. चव्हाण यांना शंभर टक्के पाठिंबा दिला. सुरेश मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. भगवानराव मोहिते यांनी आभार मानले.