प्रत्येक महसूल मंडळनिहाय पीक पाहणी करून फेर सर्व्हेक्षण करा- चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा | सतिश शिंदे

कमी पावसामुळे नुकसान झालेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचा महसूल मंडळनिहाय फेर सर्व्हे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. आमदार सर्वश्री चरण वाघमारे, रामचंद्र अवसरे, बाळा काशिवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी महसूल सुभाष चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बैठकीत उपस्थित सर्व आमदार यांनी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आग्रही मागणी केली. दुष्काळातून सुटलेल्या तालुक्यांसाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासन समिती स्थापन करणार असून या समितीसमोर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन निश्चित मदत करणार आहे, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री म्हणाले की, ज्या महसूल मंडळात जास्त नुकसान झाले अशा सर्व महसूल मंडळातील गावात पीक कापणीचे अतिरिक्त प्रयोग घेऊन फेर सर्व्हे करण्यात यावा. यावेळी आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधीना सोबत घ्यावे व त्यांच्या सहमतीने अहवाल तयार करावा. पीक कापणी प्रयोगाला काही ठिकाणी आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नुकसानग्रस्त व गरजू एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले. ज्या महसूल मंडळात जास्त नुकसान झाले, अशा ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये पीक पाहणीचा अंदाज घेण्यासाठी पीक कापणीचे अतिरिक्त चार प्रयोग करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री.गोयल यांनी यावेळी दिली.

दुष्काळात सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करून पालकमंत्री म्हणाले की, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळेल याची काळजी घेण्यात यावी. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून पालकमंत्री म्हणून शासनाकडे पाठपुरावा करून मदत मिळवून देण्यात येईल.