प्रभावी आणि परिणामकारक उपचारासाठी आरोग्यसुविधांचा लाभ रुग्णांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात येणार – मुख्यमंत्री फडणवीस

IMG WA
IMG WA
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर | सतिश शिंदे

समाजातील गरीब व गरजू लोकांपर्यंत प्रभावी व परिणामकारक आरोग्यसुविधेचा लाभ त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येत असून गरीब व गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे कार्य अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमार्फत राज्यातील अत्यंत गरजू व गरिबांना खर्चिक व तातडीच्या उपचारासाठी 450 कोटी रुपये उपलब्ध केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचवू शकलो. केवळ उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून गरजू नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील नागरिकांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात अटल महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरिष महाजन, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण व औषध प्रशासन मंत्री गिरिश बापट, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, मल्लिकार्जुन रेड्डी, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव, माजी खासदार अजय संचेती, सचिव डॉ. संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, सिने अभिनेते नागेश भोसले तसेच राज्यभरातून आलेले मान्यवर डॉक्टर उपस्थित होते.
अटल ओरल हेल्थ मिशनच्या वेबसाईट, प्रातिनिधिक स्वरुपात रुग्णांना आरोग्य साधनांचे वाटप, आरोग्यविषयक माहिती देणारी पुस्तके तसेच ‘गोल्डन अवर’ मध्ये घ्यावयाची काळजी आदी पुस्तिकेचे लोकार्पण तसेच बांधकाम कामगारांना विविध योजनांतर्गत देण्यात आलेल्या लाभाच्या रकमांचे धनादेशाचे वाटप यावेळी करण्यात आले. आरोग्य शिबिरातील रुग्णांची तपासणी करण्यासाठी आलेल्या सर्व नामांकित डॉक्टर्स व वैद्यांचा कार्यक्रमात हस्ते सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले, गरजू आणि गरीब रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्यभर आरोग्य शिबिरांचे आयोजन यशस्वीपणे करण्यात येत आहे. जवळपास 20 लाख रुग्णांची आरोग्य तपासणी याअंतर्गत करण्यात आलेली आहे. नागपूर येथेही अटल आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. राज्यभरातील व देशातीलही नामांकित डॉक्टर या शिबिरात उपस्थित राहून रुग्णांची आस्थेवाईकपणे तपासणी करीत असून आरोग्य सुविधा देत आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे. आरोग्य शिबिरांच्या आयोजनामध्ये विविध सामाजिक संघटना तसेच कंपन्यांच्या ‘सीएसआर’ निधीचा मोठा हातभार लागलेला आहे. आरोग्य शिबिरांची संकल्पना अभिनव असून याद्वारे रुग्णांना सुविधा मिळत आहे. अटल आरोग्य महाशिबिरांतर्गत 32 ओपीडीमधून रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यात आली आहे. शिबिरातील तपासणीनंतर आवश्यकता भासल्यास रुग्णांवर शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत. अशाप्रकारची आरोग्य शिबिरे नक्कीच दिलासादायक ठरत आहे.
विविध आरोग्य योजनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत 50 कोटी लोकांना लाभ देण्यात येणार आहे. राज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतूनही रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. राज्यातील 90 टक्के नागरिकांना एक हजारपेक्षा जास्त रोगांकरिता मोफत उपचार मिळण्याची सुविधा या अंतर्गत आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून साडेचारशे कोटी रुपयांची मदत देण्यात आली. यामुळे अनेकांचे प्राण वाचले. याशिवाय कर्णबधिर, लहान मुलांवरील हृदय शस्त्रक्रिया तसेच अन्य आजारांवरही नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळांतर्गत विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून 10 लाख कामगारांची नोंदणी या अंतर्गत करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, केंद्र शासन व राज्य शासनामार्फत विविध योजनांद्वारे गरीब व गरजू रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यात येत आहे. देशातील व राज्यातील नामांकित डॉक्टर या शिबिरांमधून रुग्णांची तपासणी करीत आहेत. अशाप्रकारची आरोग्य शिबिरे गरजू रुग्णांसाठी निश्चितच उपयुक्त आहे. नागपूर येथे लवकर ‘एम्स’ रुग्णालयाची उभारणी झाल्यानंतर रुग्णांना अधिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. राज्याच्या काही भागात आदिवासी क्षेत्रामध्ये सिकलसेल, ॲनिमिया या आजारांचे प्रमाण जास्त असल्याने यासंदर्भातील उपचार व आरोग्य शिबिरांचे आयोजन या भागात करणे गरजेचे ठरणार असल्याचेही श्री. गडकरी यांनी नमूद केले.

वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरिष महाजन म्हणाले, राज्यभरामध्ये आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जवळपास 20 लाख रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. पैशा अभावी उपचार घेता आले नाहीत. अशी स्थिती यापुढे राहणार नाही. राज्यातील प्रत्येक गरीब रुग्णांना आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत हा शासनाचा निर्धार आहे.

अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण व औषध प्रशासन मंत्री गिरिश बापट म्हणाले, राज्यभर आयोजित करण्यात येत असलेल्या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. या माध्यमातून रुग्णांना मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्यही देण्यात येत आहे. रुग्णांना औषधे व गरिबांना अन्नधान्य उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा निर्धार आहे.

महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी म्हणाले, अटल आरोग्य महाशिबिरांतर्गत 32 हजार नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. 42 हजार रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव म्हणाले, महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळांतर्गत विविध प्रकारच्या 28 योजना राबविण्यात येत असून राज्यामध्ये कामगारांची नोंदणी करण्यात येत आहे. नेत्ररोग, हृदयरोग, अस्थिव्यंगोपचार, जनरल सर्जरी, मेंदूरोग, बालरोग, मूत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, कान, नाक, घसा, कानाच्या मशिन्स, स्त्रीरोग, कर्करोग, दंतरोग, जनरल मेडिसीन, श्वसनविकार व क्षयरोग, ग्रंथींचे विकास, लठ्ठपणा, मानसिक आरोग्य, त्वचा व गुप्तरोग, जेनेटिक विकार यावर शिबिरात तपासणी करण्यात आली.

लहानग्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याने मिळाले समाधान – मुख्यमंत्री

सांगली येथील एका कार्यक्रमामध्ये अनेक लहानग्यांनी सुहास्यवदनाने माझे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. या सर्व मुलांची हृदयावरील शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती. मुख्यमंत्री सहायता निधीतून या लहान मुलांवर हृदय शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य मिळाले असल्याचे त्यांच्या पालकांनी सांगितले. या लहान मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले निरागस हास्य मला सर्वात मोठे समाधान देणारे ठरले असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिबिरामधील सर्व कक्षांना भेट देवून पाहणी करुन तेथील रुग्ण व डॉक्टरांशी संवाद साधला. सर्वांना चांगले आयुरारोग्य लाभो अशा शुभेच्छाही श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.