किस्से राजकारणापलीकडचे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि नुकतेच सातार्यातून उदयनराजे भोसले यांचा पराभव करुन खासदार म्हणुन निवडुन आलेले श्रीनिवास पाटील यांच्या मैत्रीबद्दल सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. पवार आणि पाटील काॅलेजमध्ये असल्यापासूनचे मित्र आहेत. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से तुम्ही याआधी बर्याचदा एकले असतील. मात्र पुण्याच्या फर्ग्युसन रस्त्यावरील वैशाली हाॅटेल समोरुन शरद पवार यांना एका पोलीसाने काॅलर धरून हाकल्याचा किस्सा तुम्हाला माहिती आहे काय?
शरद पवार पुण्याच्या बीएमसीसी काॅलेजला होते तर श्रीनिवास पाटील स.प. महाविद्यालयात. काॅलेजचं वय म्हटलं की रात्रभर गप्पा टप्पा आणि दुनियादारी आलीच. असंच एकेदिवशी पवार आणि पाटील फर्ग्युसन रस्त्यावरील कॅफे मद्रास (आत्ताचे हाॅटेल वैशाली) समोर कट्ट्यावर बसले होते. रात्री विशिष्ट वेळेनंतर हाॅटेल/दुकाने सुरु ठेवायला तेव्हाही परवानगी नव्हती. पोलीसांची राऊंडवर आलेली एक गाडी पवार आणि पाटील बसलेल्या ठिकाणी येऊन थांबली. गाडीतून उतरकेल्या पोलीसांने पवार यांना खालून वर पर्यंत निरखून पाहिलं आणि त्याचा काहीतरी वेगळाच समज झाला. ये पोरांनो चला निघा येथून असं म्हणुन त्या पोलीस अधिकार्यानं पवार यांना हटकलं. मात्र एकतात ते पवार कुठले. आम्ही उठत नाही असं पवारांनी त्या अधिकार्याला सांगितलं. पवारांनी असं म्हणताच त्या अधिकार्यांने पवारांची काॅलर धरली आणि निघता का आता असं म्हणुन जायला सांगितलं.
पोलीसांनं काॅलर धरली आता यापुढचं काही नको व्हायला म्हणुन मग पवार आणि पाटील यांनी तेथून काढता पाय घेतला. हा किस्सा खुद्द शरद पवार यांनीच मागे एका मुलाखतीत सांगितला होता.