टीम, HELLO महाराष्ट्र | तोट्यात असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी टेलिकॉम कंपनीला खर्चाचा ताळमेळ घालणे दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. एकीकडे त्यांना जागा भाड्याने देऊन आपला खर्च भागवावा लागत आहे तर दुसरीकडे खर्चात कपात करण्यासाठी आपल्या सुमारे ८० हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्याची वेळ आली आहे. यासाठी सरकारकडून मंजुरी मिळताच इच्छूक कर्मचाऱ्यांना आकर्षक पॅकेज देऊन निवृत्त करण्यात येणार असल्याचे बीएसएनएलचे चेअरमन प्रवीणकुमार पूरवार यांनी सांगितले. आहे.पूरवार यांनी म्हटले की, “आम्ही स्वेच्छानिवृत्तीच्या प्रस्तावावर विचार करीत आहोत. त्यानुसार, सुमारे ७० ते ८० हजार कर्मचाऱ्यांना आम्हाला स्वेच्छेने निवृत्त द्यायची आहे.
यासाठी त्यांना आकर्षक पॅकेज देण्यात येणार आहे. यांपैकी ६० ते ७० हजार कर्मचाऱ्यांनी जरी स्वेच्छानिवृत्ती घेतली तरी कंपनीत १ लाख कर्मचारी शिल्लक राहतील. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना निवृत्ती दिल्यानतंर त्याजागी आऊटसोर्सिंगद्वारे कर्मचारी भरण्यात येतील.
तसेच महिन्याच्या करारावरही काही लोकांना घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.पूरवार पुढे म्हणाले, इतर टेलिकॉम कंपन्यांप्रमाणे बीएसएनएललाही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महसूल वाढवणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे. त्यानंतर कामकाजाचा खर्च दुसरी प्राथमिकता आहे. त्याचबरोबर इतरही असे अनेक खर्च आहेत जो मर्यादित ठेवण्यावर आम्ही विचार करीत आहोत. केवळ वीजेसाठी आमचा २७०० कोटी रुपयांचा खर्च होतो हा खर्च आम्ही १५ टक्क्यांनी कमी करण्याच्या प्रयत्नात आहोत.