बुलढाणा प्रतिनिधी | गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. सततच्या संततधार आणि जोरदार पावसामुळे जिल्ह्यामधील ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून पाच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
पहिली घटना मलकापुर तालुक्यातील लासुरा येथे घडली. जोरदार पावसामुळे येथील विश्वगंगा नदीला पुर आला आहे. नदीमध्ये पोहायला गेलेल्या सागर टोंगळे आणि दीपकसिंग राजपूत या दोन युवकांचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुड़ुन त्यांचा मृत्यु झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
त्याचप्रमाणे जामोद येथील 25 वर्षीय अविनाश मोरे या युवकाचा पाय घसरून विहिरीत पडून मृत्यु झाला आहे. दरम्यान त्याला पोहता येत नसल्या कारणाने त्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे.
संग्रामपुर तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वारी हनुमान येथील प्रख्यात डोहात सख्या मामा – भाच्याचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला आहे. यामध्ये 38 वर्षोय हीरालाल भिलावेकर या व्यक्तिचा आणि त्यांच्या भाच्याचा डोहातील पाण्यात बुड़ुन मृत्यु झाला.
तर धामनगाव येथील राहणाऱ्या चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या 10 वर्षीय आदित्य पाटिल या चिमुकल्याचा शेततळ्यात पडून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या सर्व घटनांमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.