‘भाजपने आपली दारे पूर्णपणे उघडली तर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणीच शिल्लक राहणार नाही,’ अशी टोलेबाजी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी केली. भाजपच्या ‘महाजनादेश यात्रे’च्या दुसऱ्या टप्प्याचा रविवारी सोलापूरमधील इंदिरा गांधी स्टेडियमवर समारोप झाला. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते.
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पाश्र्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधून भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांची यादी वाढत चालली आहे. या पक्षांतरावरून शहा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. ‘गेल्या पाच वर्षांत फडणवीस यांनी केलेल्या कारभाराचा हिशेब जनतेसमोर मांडण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्यात आली आहे. हिंमत असेल तर शरद पवार यांनी याआधी अनेक वष्रे राज्यात केलेल्या कारभाराचा हिशेब द्यावा’, असे आव्हान शहा यांनी पवार यांना दिले.
शरद पवार आणि राहुल गांधी यांनी अनुच्छेद ३७० बाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही शहा म्हणाले. ‘मोदींच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षांत फडणवीस यांनी उद्योग, गुंतवणूक, रोजगार आदी सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला प्रथम स्थानावर आणले आहे’, असेही शहा यांनी सांगितले.