नागपूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी भाजपचे उमेदवार होण्यास इन्कार केला आहे. भाजपाची उमेदवारी डावलून त्यांनी विधानपरिषदेची निवडणूक रासपाचे उमेदवार म्हणुन लढवण्याचे निश्चित केले आहे. जानकर रासपाच्या उमेदवारीवर ठाम राहील्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. नारायन राणे, विनायक मेटे आदींपाठोपाठ जानकर यांनी भाजपची उमेदवारी घेऊन विधानपरिषदेवर जावे यासाठी मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस तसेच अन्य वरिष्ठ नेते प्रयत्न करत होते. परंतु सर्वांचे प्रयत्न हाणून पाडत महादेव जानकर यांनी स्वत:च्या राष्ट्रीय समाज पक्षाची उमेदवारी घेऊनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या पृथ्वीराज देशमुख यांनी अतिरिक्त उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी अर्ज मागे घेतल्यास सर्व ११ सदस्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.