हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे’ आणि ‘पवार’ हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे ब्रॅण्ड आहेत. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरेही ठाकरे या ब्रँडचेच घटक आहेत. या सगळ्याचा फटका त्यांनाही भविष्यात बसणार आहे. शिवसेनेसोबत त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक या सदरात ‘मुंबईचे खच्चीकरण कोणासाठी! जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची!!’ हा लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी ठाकरे ब्रॅंडचा उल्लेख करत राज ठाकरेंना भावनिक साद घातली आहे.
मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचाच एक भाग आहे. हे ग्रहण ‘उपरे’ लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणे आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईस पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अवमान करणाऱ्य़ा एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेने कारवाई करताच महापालिकेचा उल्लेख ‘बाबर’ असा करण्यात आला. मुंबईला आधी पाकिस्तान, नंतर बाबर म्हणणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्रात भाजप उभा राहतो हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे असा हा कठीण काळ आलाच आहे,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंबईचे महत्त्व, मुंबईचे वैभव कमी केले की महाराष्ट्राचे आपोआप पतन होईल, असे ज्यांच्या मनात आहे ते मराठी माणसाला कमी लेखत आहेत,’ असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’