पुणे प्रतिनिधी। ‘महायुतीच्या जागा वाटपामध्ये काही सूत्र ठरले होते. त्यानुसार, माझी हक्काची जागा मला मिळाली. महायुतीमधील पक्षाच्या विद्यमान आमदारांच्या जागा त्याच पक्षाकडे राहतील, हे निश्चित होते. त्यामुळे आज जागा वाटप झाल्यानंतर पुरंदरचा विद्यमान आमदार असल्याने ही माझी हक्काची जागा मला मिळाली. ती देऊन कोणी माझ्यावर उपकार केलेले नाहीत’, असा टोला शिवसेनेचे मंत्री आमदार विजय शिवतारे यांनी भाजपाला नाव न घेता लगावला. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच यंदाही मी पुरंदरमधून निवडून येतो की नाही, ते पहाच असे आव्हान त्यांनी अजित पवारांना दिले.
पुणे शहरातील आठही मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आहेत. शहरातील जागा मागण्यात तुम्ही कुठ कमी पडला का? नेमके जागा वाटपाचे सूत्र काय ठरले होते. या प्रश्नावर शिवतारेंनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले,’ महायुतीचे विधानसभा जागांचे वाटप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यात झालेल्या चर्चेनुसार झाले आहे. यामध्ये काही ठिकाणी पुणे, नवी मुंबई आदी ठिकाणी शिवसेनेला जागा न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये जरूर नाराजी आहे. ते सर्व नाराज कार्यकर्ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करीत आहेत. या चर्चेतून कार्यकर्त्यांची नाराजी दूर होईल,’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधील उमेदवारी बद्दल विचारले असता ते म्हणाले, देशातील नागरीक कोणी कुठेही लढू शकतो. तो त्याचा हक्क असून त्यानुसार चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत महायुतीने दिलेल्या उमेदवारांचे कार्यकर्ते एकदिलाने काम करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.