सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरुन सध्या राज्यात जोरदार सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. भाजपकूडन शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळत नसल्यामुळे शिवसेना सत्तास्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देण्यास नकार देत आहे. अशामध्येच बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी राज्यपालांना पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भंगतसिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले होते. पण भाजप-शिवसेनेत वाद सुरु असल्यामुळे अभिजित बिचुकले यांनी सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे पत्राद्वारे दावा केला आहे. सध्या बिचुकले यांच्या पत्राची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
‘गेले 20 वर्ष मी समाजकारण आणि अपक्ष राजकारण करीत आहे. सातारा जिल्ह्यातील ताकदवान नेते माजी खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या विरुद्ध मी संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार चार वेळा निवडणूक लढली आहे. राष्ट्रपतीपदासाठीही मी प्रयत्न केले होते. नुकतेच मी वरळी विधानसभा मतदारसंघातुनही विधानसभा निवडणूक लढवली आहे, असं बिचुकले यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय.
या पत्राद्वारे बिचुकले यांनी निवडून आलेल्या आमदारांना आवाहन केले की, ‘स्वााभिमानी, होतकरु, शिवप्रेमी तसेच समाजासाठी विशेष कार्य करण्याची जिद्द असलेल्या सर्वांनी जात, धर्म आणि पक्ष बाजूला ठेवून मुख्यमंत्रिपदासाठी मला पाठिंबा द्यावा’, असं म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना नुकतेच भाजपने राज्यपालांना भेटून आम्ही सत्तास्थापन करु शकत नाही, असं सांगितले. सत्तास्थापनेसाठी शिवसेना भाजपला पाठिंबा देत नसल्यामुळे आम्ही सत्तास्थापन करु शकत नाही. त्यामुळे आता राज्यात शिवसेना सरकार स्थापन करणार का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करेल, असंही म्हटलं जात आहे.