मोदींना बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र | सार्वजनिक स्वच्छतेच्या हेतूने देशात ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरु करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या योगदानासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा गौरव केला जाणार आहे. बिल अ‍ॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून त्यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती सोमवारी पंतप्रधान कार्यालयाने दिली.

या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, “आणखी एक पुरस्कार, प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा आणखी एक क्षण. कारण, पतंप्रधान मोदींची मेहनत आणि प्रगतीशील धोरणाची जगभरात प्रशंसा केली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांचा बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून गौरव केला जाणार आहे.”

यापूर्वी सहा मुस्लिम राष्ट्रांनी आणि रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना गौरविले आहे.ऑक्टोबर २०१८ मध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी पंतप्रधानांचे कौतुक केले होते. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून देशात ८ कोटींहून अधिक स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे देशात पाच लाख गावे ही हागणदारीमुक्त झाली असल्याचे सरकारी आकडेवारीवरुन कळते.