दसरा विशेष | दसरा जवळ आला की, बाईंची लगबग सुरू होते ती ‘पाटीपूजना’च्या तयारीची. पाटीवर सरस्वती काढून आणा, येताना फुलं, हळद-कुंकू आणा, अशा सूचना बाईंकडून केल्या जातात. आणि मग दस-याच्या आदल्या दिवशी शाळेत तुम्ही सगळे जण मिळून पाटीपूजन करत असाल. पण केवळ शाळेतच नाही तर घरीसुद्धा पाटीपूजन केलं जातं. पण हे पाटीपूजन का केलं जातं? तर मुलांनो पाटीवर आपण आपलं पहिलं अक्षर गिरवतो. तिथून आपल्या शिक्षणाला सुरुवात होते. त्यानंतर भरपूर शिकून आपण यश मिळवतो. पण ज्या पाटीने आपल्याला ‘साक्षर’ केलं तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला नको? दस-याच्या दिवशीचं पाटीपूजन हे आपल्या या पाटीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तिचे आभार मानण्यासाठी असतं. आपल्याला मदत केलेल्या व्यक्तीविषयी कायम कृतज्ञतेची भावना ठेवावी हीच शिकवण या प्रथेतून मिळते, नाही का?