परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मधुकर पिचड यांच्या भाजप प्रवेश संदर्भात गौप्यस्फोट केला आहे. शिवस्वराज्य यात्रेनिमित्त परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात शेतकरी मेळाव्यास संबोधित करीत असताना त्यांनी यासंदर्भात मोठे भाष्य केल आहे . मुंडे म्हणाले की, “पिचड साहेबांच्या दुसऱ्या पत्नी ज्या आदिवासी नाहीत त्यांनी आदिवासी म्हणून खोटे प्रमाणपत्र काढले. त्याआधारे भिवंडीतील एका गरीब सामान्य आदिवासी शेतकऱ्याची जमीन खरेदी केली. सदरील जमीन समृद्धी महामार्ग मध्ये गेल्याने जमिनीचा मोबदला म्हणून 15 कोटी रुपये पिचड यांना मिळाले आहेत.
ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानी गेल्यानंतर त्यांनी याप्रकरणी पिचड यांना कारवाईचे संकेत दिले. कारवाई होऊ नये या भीतीने पिचड यांनी शेवटी भाजपमध्ये प्रवेश केला.” अशाप्रकारे पिचड यांच्या भाजप प्रवेशाचे गुपित त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. वास्तविक पिचड यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करायला हवा होता मात्र भ्रष्टाचाऱ्यांना स्वपक्षात घेत पाठीशी घालण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले असल्याचे मुंडे म्हणाले .
तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला राष्ट्रवादी संपल्याचे दाखवत आहात . तुमच्या पापाचे घडे भरले आहेत . राष्ट्रवादी विचारांचा पक्ष आहे आमच्या सारखे मावळे असताना पक्ष संपणार नाही असे भावनिक ऊद्गारही त्यांनी काढले. संपूर्ण भाषणात त्यांनी भाजप – शिवसेना यांच्या पाच वर्षांतील योजना यांच्यावर अदृश्य योजना म्हणत टिका केलीय .