बुलढाणा प्रतिनिधी । मोकाट आणि हिंस्र बनलेल्या जनावरांच्या झुंडींमुळे शहराच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे. त्यामुळे वाहनचालकांचे जीव धोक्यात आलेत. बुलढाणा रस्त्यावर या मोकाट जनावरांमुळे झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. सुनील मोरे असे या व्यक्तीच नाव असून ते या शहरात पत्रकार आहेत. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले.
या मोकाट जनावरांमुळे या रस्त्यावर वर्षभरात अनेक अपघात झालेत. या अपघातात अनेक प्राण्यांना जीवही गमवावा लागला. मोकाट जनावरांना पकडणे, किंवा त्यांच्या मालकांचा शोध घेण्याची मोहीम पालिकेने अजूनही हाती घेतलेली नाही. त्यामुळे रस्त्यांवरील जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त झाला आहे.
बुलढाणा शहरातील प्रमुख रस्त्यांची स्थिती तर दयनीय आहेच शिवाय या मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर वाढल्यान अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यात अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झाले असून त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. शहरातील मार्गावरील आणि वेगवेगळ्या वस्त्यांतील रस्त्यांवर तर जणू काही ठिकाणी जनावरांचे साम्राज्य असल्यामुळ वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.