प्रतिनिधी ठाणे| नैना वय वर्ष फक्त १०. थॅलेसेमिया या आजारामुळे दर १५ दिवसाला तिला रक्त चढवावे लागते. या आजरापासून तिची सुटका व्हावी.यासाठी तिच्या शरीरात लहान बहिणीच्या बोन मॅरोचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे.
उल्हासनगर कॅम्प ५ येथील तानाजी नगर झोपडपट्टीमध्ये हिरासिंग लबाना हे कुटुंबासह राहतात. नैना ही त्यांची मोठी मुलगी. नैना लहानपणी सतत आजारी राहत असल्यामुळे तिची आरोग्य तपासणी केली असता तिला थॅलेसेमिया आजार असल्याचे निष्पन्न झाले. या आजारात रुग्णाला रक्त बदलण्याची आवश्यकता असते. त्यामुळे हिरासिंग यांनी संजीवनी रुग्णालयात नैनाला नेऊन दर पंधरा दिवसाआड रक्त बदलण्यास सुरुवात केली. हिरासिंग हे टेम्पो चालक असल्यामुळे उपचाराचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याने संजिवनी रुग्णालयाचे डॉक्टरांनी मोफत नैनावर उपचार सुरू केले. सात महिने संजीवनी रुग्णालयात उपचार झाल्यानंतर घाटकोपरच्या समर्पण ह्या रक्तपेढीत रक्त बदलण्यासाठी जाऊ हरिसिंग जाऊ लागले.
पंधरा दिवसांपूर्वी समर्पण ट्रस्ट मार्फत एचएल मॅचिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तेथे हिरासिंग यांचा मोठा मुलगा आणि लहान मुलगी मानवी यांच्या बोन मॅरो हा नैनाच्या बॉन मॅरोशी मिळतो का याबाबत चाचण्या करण्यात आल्या. या चाचणीत नैना आणि मानवीचा बॉन मॅरो जुळल्यामुळे मानवीच्या बॉन मॅरोचे नैनाच्या शरीरात प्रत्यारोपण करून नैना हि सुदृढ बालकासारखे जीवन जगू शकते, असे सीआयएमएस सेंटरच्या प्रोग्राम संचालिका दीपा त्रिपाठी यांनी हिरासिंग यांना सांगितले. त्यामुळे लहान बहीण मानवी आपल्या मोठ्या जीवनदान देणार आहे.
सीआयएमएस सेंटर हे नैनाची बॉन मॅरो प्रत्यारोपण हि शस्त्रक्रिया ‘ना फायदा ना तोटा’ ह्या आधारावर करणार असले तरी ह्या शस्त्रक्रियेला साधारणपणे ९ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. हिरासिंग यांच्या कुटुंबात सात जण असून ते उपजिविकेसाठी टेम्पो चालवतात. भाड्याच्या घरात राहणाऱ्या हिरासिंग यांना ९ लाखांची रक्कम जमवणे कठीण असल्याने त्यांनी उल्हासनगर शहरातील प्रतिष्ठित लोकांची गाठी भेटी घेऊन मदत मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नैनाला प्रत्येक पंधरा दिवसाला रक्त बदलण्याच्या प्रक्रियेपासून सुटका मिळवून देण्यासाठी दानशूर मंडळींनी मदत करावी असे आवाहन नैनाचे वडील हिरासिंग लबाना यांनी केले आहे.