मुंबईतील लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन प्रसारमाध्यमांसाठी करण्यात आलं. मुंबईतील लालबाग या ठिकाणी बसणारा गणपती हा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या गणपतीच्या दर्शनाला १० दिवस मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. नवसाला पावणारा गणपती अशीही या गणपतीची ख्याती आहे. आज प्रसारमाध्यमांसाठी लालबागच्या राजाची पहिली झलक दाखवण्यात आली. यावर्षी लालबागच्या राजाला चांद्रयान २ चा देखावा उभारण्यात आला आहे. बाप्पाचं हे लोभस रुप डोळ्यात साठवावं असंच आहे.
लालबागच्या राजाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविकांची गर्दी होईल यात काहीही शंका नाही. २ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पा घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान होतील. मुंबईतला गणेशोत्सव हा खासच असतो. त्यात लालबागच्या राजाचं दर्शन घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं, इच्छा असते. त्यामुळेच लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून लोक येत असतात. लालबागच्या राजाचे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही हटके देखावा केला आहे. अनेक मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारलालबागच्या दर्शनाला येतात.