विशेष प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन या दोन पक्षांनी एकत्र येत वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांनी हा वेगळा प्रयत्न राज्यात राबविताना समाजातील दुर्लक्षित आणि वंचित घटकांना प्राधान्य देण्याचा विचार केला. दलित आणि मुस्लिम मतांचा विचार यामध्ये प्रामुख्याने करण्यात आला होता.
स्वातंत्र्योत्तर काळात दलित आणि मुस्लिम मतांचा सर्वाधिक फायदा मिळवलेला पक्ष काँग्रेस आहे हे गणित डोक्यात असलेल्या या दोन्ही पक्षांनी प्रामुख्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच ९ उमेदवारांना अप्रत्यक्षपणे घरचा रस्ता दाखवला. लोकसभेसाठी त्या त्या मतदारसंघात ५० हजारांवर मते घेऊन वंचितच्या उमेदवारांनी राज्यात नवीन राजकारणाची नांदी घालून दिली. भाजपची ‘बी’ टीम असा आरोपही वंचित आघाडीवर करण्यात आला होता.
दरम्यान विधानसभा निवडणुकीआधी २ महिने एम.आय.एम पक्षाने वंचित आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतरही पक्षाचं नाव न बदलता वंचित बहुजन आघाडी या नावानेच प्रकाश आंबेडकरांनी आपले उमेदवार विधानसभेसाठी उभे केले. निकलाअंती त्यांना अकोल्यातील मूर्तिजापूर या जागेवर त्यांचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. अनेक ठिकाणी वंचित उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या २३ जागांवर थेट परिणाम केला आहे. यातील ११ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला तर १२ जागांवर काँग्रेस पक्षाला फटका बसला आहे.
काँग्रेसला फटका बसलेल्या जास्त जागा या विदर्भातील आहेत. चिखली, खामगाव, पश्चिम अकोला, धामणगाव रेल्वे, चिमूर, राळेगाव या विदर्भातील, आर्णी, फुलंब्री, चांदीवली, उस्मानाबाद या मराठवाड्यातील, पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर या पुण्यातील काँग्रेसच्या जागांवर वंचित बहुजन आघाडीने परिणाम केला आहे. शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंटमध्ये भाजप उमेदवार ५ आणि ३ हजारांचं मताधिक्य मिळवलं असून या दोन्ही ठिकाणी वंचित आघाडीने १० हजार मते घेतली आहेत.
अशाच प्रकारे राष्ट्रवादीच्या ११ जागांवरही वंचितचा परिणाम झाला आहे. या २३ जागा मिळवण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी यशस्वी झाली असती तर कदाचित महाराष्ट्राची सत्तासमीकरणे वेगळी दिसली असती.