औरंगाबाद : “वंचित बहुजन आघाडीमुळं आंबेडकरी समाजात नैराश्य आलं, असा आरोप रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 26 व्या नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी औरंगाबादमध्ये आले होते. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. तसेच नवीन पर्याय देणार असल्याचेही म्हंटले आहे.
आनंदराज आंबेडकर म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीला आम्ही पाठिंबा दिला होता, पण वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजात नैराश्य आलं आहे. वंचितला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आंबेडकरी समाज वंचित आघाडीबाबत निराश झाला आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत आलेले ओबीसी नेते हे खरे ओबीसी समाजाचे नेते होते का? हा प्रश्न आहे. त्यामुळे वंचित आघाडी समाजापर्यंत पोचली का हाही प्रश्न आहे. वंचित सोबत जोडल्या गेलेल्या इतर घटकांचे मतदान वंचितला मिळाले का हा देखील मोठा प्रश्न आहे.”
आनंदराज आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आहेत. आनंदराज आंबेडकर यांच्या या पवित्र्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सोबत असणाऱ्या आनंदराज आंबेडकर यांनी आता वंचित बहुजन आघाडीच्या विरोधातच भूमिका घेतली आहे. यामुळे भविष्यात प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर या दोन्ही भावांमध्येच राजकीय द्वंद पाहायला मिळण्याची शक्यता आहे. लक्ष्मण गायकवाड, गोपीचंद पडळकर या नेत्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांचे बंधू असलेले आनंदराज आंबेडकर यांनीच वंचितची साथ सोडली आहे. हा वंचित बहुजन आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.