मुंबई प्रतिनिधी । आज सकाळी राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी किमान १५ आमदारांना सोबत घेत धक्कादायकरित्या भाजपाला पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळं दवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर अजित यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या बंडामुळं राष्ट्रवादीला खिंडार पडले कि काय असा सवाल उपस्थित झाला असता आता वारं पुन्हा एकदा फिरलं आहे.
जे आमदार सकाळी अजित पवार यांच्यासोबत होते त्यापैकी ७ जणांनी आम्ही राष्ट्रवादीतच राहणार आहोत असं स्पष्ट केलं. आज सकाळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवार यांनी आम्हाला अंधारात ठेवत राजभवनात नेलं असा खुलासा केला. तसेच आम्ही शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहोत असं जाहीरपणे सांगितलं.
दरम्यान आता आणखी काही आमदारांनी ट्विटरच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादीसोबतच असल्याचं स्पष्ट केलं आहे. माणिकराव कोकाटे आणि दिलीप बनकर यांनी याबाबत ट्विटवरवरून माहिती दिली. तर सुनील भुसारा,राजेंद्र शिंगणे, नरहरी झिरवळ,सुनील शेळके, सुनील टिंगरे यांनी आता जाहीररीत्या आपण बंड करणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता अजित पवार आपलं पुढचं पाऊल काय उचलतात याबाबत सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही.अजितदादा पवार यांच्या सांगण्यावरुन मी राजभवनावर गेलो होतो. गटनेते असल्याने आदेश पाळला.तिथे क़ाय होणार आहे याबाबत काहीच माहीत नव्हते.पण मी पक्षासोबत आहे. एकदा घेतलेला निर्णय आपण कदापीही बदलनार नाही.!@NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule
— Manikrao Shivajirao Kokate (@kokate_manikrao) November 23, 2019
मी @NCPspeaks बरोबरच आहे माझा आदरणीय @PawarSpeaks साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे @AjitPawarSpeaks हे गटनेते असल्याने त्यांच्या सांगण्यावरून मी इतर आमदारांसोबत राजभवनात गेलो होतो तिथे काय होणार आहे या बाबत कोणतीही कल्पना नव्हती, मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही ! pic.twitter.com/VRJrTnMAzq
— Diliprao Bankar (@dilipraobankar) November 23, 2019