सांगली प्रतिनिधी| विटा येथील मतिमंद महिलेच्या असहाय्यतेचा फायदे उचलत तिच्यावर बलात्कार करणारा नराधम दत्तात्रय चव्हाण-नाईक याला आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्र्वर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सदरचा गुन्हा जानेवारी २०१५ साली घडला होता.
यातील पीडिता तिच्या आई व भावासोबत भवानीमाळ विटा येथे राहत होती. ती मतिमंद असल्याने तिचे लग्न झाले नव्हते. यातील आरोपी पीडित महिलेच्या घराशेजारच्या पाटील चाळीत त्याच्या पत्नीसह राहत होता. पीडित महिला सायंकाळच्यावेळेस शौचास बाहेर गेल्यावर आरोपी तिच्यामागे जाऊन महिलांच्या शौचालयात येऊन त्या पीडितेवर लैंगिक अत्याचार करीत होता. त्याने अनेकवेळा तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. त्यामुळे पीडिता गरोदर राहिली होती.
जुलै २०१५ मध्ये तिच्या पायाला सूज आल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले. तिची तपासणी केली असता ती ६ महिन्याची गरोदर असल्याचे समजले. हे ऐकल्यावर तिच्या आईला धक्का बसला. अखेरीस तिच्या आईने तिला विश्र्वासात घेऊन विचारल्यावर तिने हकीकत सांगितली. यानंतर तिच्या आईने विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीच्या आधारे दत्तात्रयवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेने मुलास जन्म दिला. पीडितेचा, आईचा व अन्य साक्षीदारांचा जबाब नोंदवले. मुलीची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. आरोपीला अटक करून त्याचीही वैद्यकिय तपासणी करण्यात आली. पीडित महिलेचे, आरोपीचे व मुलाच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. प्रयोगशाळेच्या अहवालात पीडिता ही मुलाची आई व आरोपी हा वडील असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. सर्व साक्षीपुराव्यांच्या आधारे आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली.
[