सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
जाती पाती इथे नांदती, सुखी राहण्यास पीरास करतो नवस मराठा, मियाँ मारूतीस… महाकवी गदीमांच्या या चार ओळीतील एकोप्याचा, सलोख्याचा समाज पहावयास असेल तर, विट्याच्या मशिदीसमोर नक्कीच दिसेल. येथील हिंदू – मुस्लिम समाजातील काही युवकांनी समता ग्रुप संचलित गावभागचा राजा गणेश मंडळ सुरू केले आहे. अगदी मशिदीच्या दारातच या मंडळाने त्यांच्या गणरायाची आरास केली आहे, ही आरास करण्यासाठी मशिदीतूनच लाईटचे कनेक्शन घेतले आहे. आता नमाज पढला जातो आणि नमाज संपताच बाहेर येऊन गणेशाची आरतीही केली जाते, हा हिंदू – मुस्लिम ऐक्याचा संदेश निश्चतच समाजासाठी प्रेरणादायी आहे.
विटा हे शहर नेहमीच जातीय सलोखा ठेवणारे म्हणून ओळखले जाते. विट्याचा कुंभारवाडा आणि मुस्लीम मोहल्ला एकाच ठिकाणी आहे. ज्यावेळी गणेशमूर्ती तयार करण्याचे काम कुंभार समाजातील बांधव करतात. त्यांना अनेकदा जागा अपुरी पडते. त्यावेळी मशिदीसमोर रमजानासाठी उभा केलेल्या मंडपात गणेशमूर्ती तयार करण्याचे काम केले जाते. काहीवेळा सुरक्षिततेसाठी मशिदीच्या प्रवेशद्वारावर असणार्या पिरबाबाच्या खोलीत गणेशमूर्ती ठेवल्या जातात याच खोलीत मोहरमसाठी बनविलेले ताबूत ही ठेवले जातात.
राज्यात गणेश चतुर्थी, ईद अशा सणासाठी पोलिसांना जेव्हा बंदोबस्त ठेवावा लावतो, त्याचवेळी विट्यातील हे धार्मिक ऐक्य सर्वांसाठीच आदर्शवत ठरते. काही वर्षापूर्वी मिरजेत जेव्हा दंगलीचा प्रकार घडला होता, त्याचवेळी विट्यातील सर्वधर्मीय, सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन सामाजिक सलोख्याची परंपरा कायम ठेवली होती. सन २०१४ मध्ये समता गणेश मंडळ संचलित गावभागचा राजा मंडळाची स्थापना केली. या मंडळाला सुरूवातीला जागाच मिळत नव्हती, त्यामुळे त्यांनी थेट मशिदीच्या प्रमुखांना गाठले अन गणेशोत्सवाची कल्पना दिली. त्यांनी तात्काळ मशिदीच्या समोरील पटांगणात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यास मान्यता दिली. येवढेच नाही तर त्यांनी या गणेशमंडळाला मशिदीतून लाईट दिली.
अगदी मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ गणेशमंडळाचे शेड उभे आहे, मूर्ती आणि आरास अत्यंत साधीच असली तरी समोरून त्याकडे पाहताना गणेशाच्या मागील मशिदीची इमारत एक वेगळाच व विलोभनीय देखावा दाखवून जाते. या युवकांच्या प्रयत्नातून याठिकाणी गणेशोत्सव साजरा व्हायला सुरूवात झाली. हिंदू – मुस्लिम समाजातील हे युवक गेल्या सहा वर्षापासून समता गणेश मंडळ संचलित गावभागचा राजा मंडळाच्या माध्यमातून गणरायाची मनोभावे प्रतिष्ठापना करीत आहेत. तसेच या मंडळाचा विविध सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभाग असतो. या मंडळाच्या माध्यमातून युवकांनी समाजाला सामाजिक ऐक्याचा संदेश दिला आहे.