परभणी प्रतिनिधी, गजानन घुंबरे : साईबाबांच्या जन्मस्थानाचा वाद चांगलाच पेटलाय. जन्मस्थानाच्या मुद्यावरून शिर्डीकरांनी आज बंद पुकारला आहे तर शिर्डीकरांना सद्बुद्धी मिळावी याकरिता परभणीत साई जागर सुरु करण्यात आला. या साई जागरामध्ये जिल्ह्याचे खासदार संजय जाधव व पाथरीचे विधानसभेचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी भजन करत सहभाग घेतला आहे. पाथरी येथील साई मंदिरामध्ये मंगळवारपासून महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
साई जन्मभूमीच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०० कोटींचा निधी जाहीर केल्यानंतर साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्ह्यातील पाथरी की शिर्डी हा वाद उफाळून आला आहे. या जन्मस्थानच्या मुद्यावरून शिर्डीमध्ये आज बंद पुकारण्यात आला आहे. शिर्डीकरांच्या या धोरणा विरोधात आज परभणीत खासदार संजय जाधव यांनी शिर्डीकरांना सद्बुद्धी मिळावी याकरिता साई जागर सुरू केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथे सुरू असलेल्या जागरात मोठ्या संख्येने परभणीकरांनी भाग घेतला आहे. त्यामुळे शिर्डी-पाथरी वाद प्रत्येक दिवशी वाढतच चालल्याचे दिसून येत आहे
साई जागर कार्यक्रमामध्ये पाथरी विधानसभेचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आम्ही पाथरी जन्मस्थान विकासासाठी निधी मागितल्यावर मुख्यमंत्र्यानी शंभर कोटी रुपयांचा निधी घोषीत केला. त्यातील 90 कोटी रुपये हे परिसरातील भूसंपादन करण्यात व त्याबदल्यात मोबदला देण्यात खर्च होणार आहेत तर उर्वरित 10 कोटी रुपयांमध्ये येणाऱ्या साईभक्तांसाठी भक्तनिवास उभारण्यात येणार आहे. साई जन्मस्थान पाथरीच असल्याचे आमच्याकडे भक्कम पुरावे असताना शिर्डीवासीयांनी वाद न घालता सहकार्याची भावना ठेवावी असं आवाहन यावेळी आमदारांनी केले आहे.
दरम्यान सोमवारी दुपारी पाथरी साई मंदिरामध्ये कृती समिती अध्यक्ष व श्रीसाई स्मारक समिती विश्वस्त विधानसभा आमदार बाबाजानी दुर्राणी,परभणीचे आमदार राहुल पाटील, आमदार सुरेश वरपूडकर , माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर, जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे, माजी आ. माणिकराव आंबेगावकर, कृउबास सभापती अनिल नखाते यांनी मंगळवारपासून साई मंदिरामध्ये सुरू होणाऱ्या महाआरती संदर्भात बैठक घेतली आहे.