अहमदनगर प्रतिनिधी | अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुरेश गिरे पाटील असे मृताचे नाव आहे. यांची पाच ते सहा जणांच्या टोळीने गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. पूर्ववैमनस्यातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी या घटनेनंतर सरकारवर सडकून टीका केली आहे .
अहमदनगर सारख्या संवेदनशील व राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्याला गेले ३ महिने पूर्णवेळ पोलीस अधीक्षक नाही. आता शिवसेना नेत्याची हत्या झाल्यावर तरी सरकारला जाग येणार आहे का ? असा सवाल तांबे यांनी उपस्थित केला आहे .
अहमदनगर सारख्या संवेदनशील व राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्याला गेले ३ महिने पूर्णवेळ पोलिस अधिक्षक नाही, आता शिवसेना नेत्याची हत्या झाल्यावर तरी सरकारला जाग येणार आहे का ? pic.twitter.com/eU77pJQ5wi
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) March 16, 2020
दरम्यान भोजडे गावातील रहिवासी असलेले सुरेश गिरे काल (रविवार १५ मार्च) घरी होते. संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास बाईक आणि कारमधून पाच ते सहा हल्लेखोर आले. त्यांनी गिरे यांना बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने वार केल्याचीही माहिती आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी सुरेश गिरे यांच्यावर गोळ्या झाडल्या.
गोळीबारात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं होतं. सुरेश गिरे यांच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, पूर्ववैमनस्यातून त्यांचा जीव घेतला गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर आरोपींना शोधण्यासाठी पथकं रवाना झाली आहेत. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे.